ओढ Poem by Rajeev Deshpande

ओढ



निघालो घेऊनी शिदोरी
रम्य होती पहाट
राब राब राबलो
तुडविली डोंगरवाट

पहारा हिरवा भवताली
भव्य निसर्गाचा थाट
वाढू लागली शिरशिरी
अवघड परतीचा घाट

झाली दिवेलावणी आता
धुकटे पसरले अफाट
झाला उशीर परतावया
करता आज बाजारहाट

ओढ लागली घराची
अंधुक झाला घाट
टाकीत पाऊले लगबग
उतरतो उतावीळ वाट

स्वागता माझ्या दारी
असेल पाणी पाट
टेकावया घडीभर आता
असेल टाकली खाट

दिवस सणाचा घेऊनी
आला आनंदाची लाट
तबकात पान कपुरी
रांगोळी गोडाचे ताट

नेसूनी जरीकाठ सखी
माळूनी गजरा दाट
थोपटीत छकुल्याला माझी
बघत असेल वाट!
(दै. मातृभूमी)

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success