Tryambak Bapuji Thombre

(1890–1918 / India)

श्रावण मास - Poem by Tryambak Bapuji Thombre

श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणांत येते सर सर शिरवें क्षणांत फिरुनि ऊन पडे

वरति बघतां इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे !

झालासा सुर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तो उघडे,
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा,
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांचि माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमतें

फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरे सांवरिती,
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी, गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गा‌ई तयांचा श्रावणमहिमा एकसुरे

सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला,
पारिजातही बघतां भामा रोष मनीचा मावळला !

सुंदर परडी घे‌उनी हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुलें पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना, हर्ष मावेना हृदयांत
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत.


Comments about श्रावण मास by Tryambak Bapuji Thombre

There is no comment submitted by members..Read this poem in other languages

This poem has not been translated into any other language yet.

I would like to translate this poem »

word flags

What do you think this poem is about?Poem Submitted: Wednesday, September 12, 2012

Poem Edited: Wednesday, September 12, 2012


[Report Error]