यावे, स्वागत आहे! Poem by Rajeev Deshpande

यावे, स्वागत आहे!

दशदिशे कडूनी अनाहत निनाद असतो
क्षितीजी अवनी नभाचा संवाद असतो

प्रपात झेलण्या आतुर पर्वताकडा असतो
मातृभूमी वरती प्राजक्ताचा सडा असतो

पूर्व पश्चिमेस रविराज खुलवित असतो
चांदराती शशिराज भान भुलवित असतो

नगश्रृंखलांचा गुंफला कंठीहार असतो
कंच हरित तरूलतिकांचा श्रृंगार असतो

संमोहण्या चक्षुंना अथांग सागर असतो
शैवालात किनारी बहुगुणी आगर असतो

अंबर धरतीचा सदा समर्पित मेळ असतो
षड् ऋतुंचा पाठशिवणीचा खेळ असतो

ऋतुराज निसर्ग नटराज नटवित असतो
टवटवीत दाट वडात चिवचिवाट असतो

बांग वेळ सकाळ कुक्कुट पाळीत असतो
पात्यांना सैरभैर वात कुरवाळीत असतो

मंद झुळुकेवर स्वार ओला मृद्गंध असतो
यत्किंचित तया पुढे तो निशिगंध असतो

आशिष देण्या सत्वर सांब भोळा असतो
दधीनवनीतावर गोपाळाचा डोळा असतो

निसर्ग उधळण मुक्त आनंद मेळा असतो
भूलोकी जीवन देवदुर्लभ सोहळा असतो!

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success