रणरणत्या जीवन पथावर
कुरकुर करतो प्रत्येक जण
भटकत रहातो वणवण जरी
हणहण संपत नाही पण
प्रत्येकाचे महत्त्व आपले
आपले आपले 'मी' पण
हक्क सांगतो आपला इथे
पर्वत धोंडा रेतीचा कण
प्रत्येकाचे विश्व आपले
प्रत्येकाचे आपले कोंदण
प्रत्येकाची जिद्द आपली
प्रत्येकाचा आपला पण
प्रत्येकाचे दुःख आपले
प्रत्येकाचे आपले व्रण
अहंकाराच्या कुरघोडीत
आपले आपल्याशीच रण
दुर्लभ दुर्मिळ जन्म इथला
हवा हक्काची इथले आंदण
निष्कपट वर्तन ठरते आपले
आपल्याच आनंदाचे कारण!
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem